बायो फेरो LO Leucinodes orbonalis (वांग्यावरील शेंडा व फळ पोखरणारी अळी)

घटक:

Leucinodes orbonalis कामगंध

ओळख व जीवनचक्र:

या किडीची मादी एकावेळेस जवळपास २५० अंडी देते. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर अळी पानाच्या मुख्य शिरेतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. पूर्ण वाढ झालेल्या अळीचा रंग गुलाबी आणि डोक्याचा रंग तपकिरी असतो. शेंडा आणि फळ पोखरणारी अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यांत, फुलांत किंवा फळांत शिरून उपजीविका करते. या किडीच्या पतंगाचा रंग पांढरा आणि तपकिरी असतो.त्याचे पंख पांढरे असतात आणि त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. त्याच्या पंखांची लांबी १७ – २३ मि.मी. असते. या पतंगाचे आयुष्य ४ – ५ दिवस असते. किडीच्या वर्षभरात आठ ते दहा पिढ्या पूर्ण होतात.

नुकसानीचा प्रकार

फिकट पांढर्‍या रंगाच्या ह्या अळ्या शेंड्यातून खोडात शिरून आतील भाग पोखरून खातात आणि त्यामुळे झाडाचे शेंडे वळून वाढ खुंटते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. लहान फळामध्ये ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून, विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडले आहे की नाही, हे कळणे अवघड असते. अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते. विष्ठा आतच सोडते. अशी कीडग्रस्त फळे खाण्यास अयोग्य ठरतात. किडीमुळे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. किडीच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष केल्यास हेच नुकसान ७० ते ८० टक्यांपर्यंत झाल्याचे आढळले आहे.

पिके : वांगी

कामगंधासोबत वापरावयाचा सापळा: डेल्टा ट्रॅप / वॉटर ट्रॅप

सापळ्यांची संख्या (प्रती एकर): १५ – २०

कामगंध बदलण्याचा कालावधी: ६० दिवस

Back to Top